महाशिवरात्रीची परंपरा
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवसाला महाशिवरात्र येते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात.
संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडवनृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
पुराणातील कथा
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- “मला मार पण इतराना सोडून दे.” हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे भगवान शिव त्याला पावन झाले.
महाशिवरात्रीचे पूजन
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात. शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हटले जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.
विविध ठिकाणी महाशिवरात्रीचे पूजन करण्याच्या पद्धती
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.
आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते.
ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.
उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.
देशातील महाशिवरात्री यात्रास्थळे
उत्सवकाळात अशा प्रकारच्या विशेष उपक्रमांचे आयोजन हे महाशिवरात्र यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.
- श्री धान्येश्वर मंदिर, धानेप, ता. वेल्हे, जि. पुणे
- श्री अगस्ती मंदिर, ता: अकोले, जिल्हा : अहमदनगर
- अंबरनाथ जिल्हा ठाणे, येथील पुरातन शिव मंदिर.
- आरमोरी तालुक्याच्या मुख्यालयाजवळच्या पहाडीवरील महादेवगड मंदिर येथे
- औरंगाबादपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या वेरूळ लेण्यांच्या जवळचे गरुडेश्वर मंदिर येथे.
- आष्टीनजीकच्या चपराळा येथील हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसरातील यात्रा
- औंढा नागनाथ येथील यात्रा
- कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कणेरी येथील यात्रा
- खडकेश्वर, (छत्रपती संभाजीनगर)
- गडचांदूर (चंद्रपूर जिल्हा)
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील मंदिर परिसरातील यात्रा
- गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील मंदिर परिसरातील यात्रा
- घारापुरी लेण्यांजवळ (मुंबई) येथील यात्रा
- घृष्णेश्वर, दौलताबाद-मराठवाडा[२८]
- चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर परिसरातील यात्रा
- ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्टेशनानजीकचे गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरातील यात्रा
- देवगडजवळची कुणकेश्वरची यात्रा
- परळी वैजनाथ, बीड जिल्हा
- पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात असलेल्या नागनाथ मंदिर परिसरात. हे गाव वाडा तालुक्यातील खनिवलीपासून दोन कि.मी.अंतरावर आहे.
- बनेश्वर (पुणे जिल्ह्यातील नसरापूर) येथे.
- भीमाशंकरची यात्रा
- राजापूर शहरानजीक असलेल्या मौजे धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर देवस्थानाच्या परिसरातली यात्रा.
- वैरागडचे भंडारेश्वर मंदिर परिसरातील यात्रा
- शिवणी-डोंगरगावजवळील चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्याच्या आवळगाव येथील सुप्रसिद्ध गुरूबाबा देवस्थान परिसरातील यात्रा
- सांगली जिल्हा कवठे महांकाळ येथे
- सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथील कोटेश्वर मंदिराच्या परिसरात
- श्री सिद्धेश्वर रत्नेश्र्वर देवस्थान (लातूर) येथील यात्रा
- सांगली जिल्ह्यातील करगणी येथे लखमेश्र्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. करगणी येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.